मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा; गर्दी न करण्याचे नागरिकांना आवाहन
आपला करोनाविरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही, तो सुरूच असून सतर्क राहून घाई-गडबड आणि गर्दी न करता आपल्याला सार्वजनिक ठिकाणी वावरावे लागेल. लोकांनी शिस्त पाळली नाही आणि गर्दी करून करोनाचा धोका वाढवल्यास पुन्हा टाळेबंदीचा विचार करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
राज्यातील लोक सुजाण असून ते गर्दी करणार नाहीत आणि पुन्हा टाळेबंदीची वेळ आणणार नाहीत, अशी आशा व्यक्त करत सुरक्षित अंतर ठेवण्याचे तसेच गर्दी न करण्याचे आवाहनही त्यांनी के ले.
देशात आणि राज्यात ३० जूनपर्यंत टाळेबंदी लागू आहेच याची त्यांनी आठवण करून दिली. राज्य सरकार जे काही निर्णय घेत आहेत ते जनतेच्या हिताचेच आहेत याची कल्पना नागरिकांना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
करोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरू करताना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री व मुख्य सचिव अजय मेहता यांच्यात संघर्ष झाल्याची आणि मंत्र्यांनी मेहता यांच्याबाबत नाराजी व्यक्त के ल्याचे वृत्तही मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेटाळले.
मंत्री आणि प्रशासन यांच्यात चर्चा होत असते. एकमेकांना सूचना केल्या जातात. याचा अर्थ दोघांमध्ये भांडण आहे असे नव्हे, असे ठाकरे म्हणाले.
मुभा आरोग्यासाठी..
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आपण काही नियम शिथील केले असता पहिल्या दिवशी गर्दी झालेली दिसली. असे करू नका. पहाटे ५ ते सायंकाळी ७ पर्यंत फिरायला जाण्याची, व्यायाम करण्याची मुभा दिली ती आरोग्यासाठी, गर्दी करून आरोग्य बिघडवण्यासाठी नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उपनगरी रेल्वे सुरू करण्याची मागणी..
अत्यावश्यक सेवेतील काम करणाऱ्या लोकांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
टाळेबंदी टप्प्याटप्प्याने लागू केली तशीच ती टप्प्याटप्प्याने आपण हटवत आहोत. करोनासह जगताना आपल्याला सतर्कता बाळगायची आहेच. मुखपट्टय़ा (मास्क) वापरणे, हात वेळोवेळी स्वच्छ ठेवणे यासारख्या सवयी अंगी बाणवायच्या आहेत. गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही. संकट अजून टळलेले नाही. हे सर्व सांगून आणि काळजी घेऊनही परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली, ती जीवघेणी होताना दिसली तर पुन्हा टाळेबंदी करावी लागेल.
– उद्धव ठाकरे , मुख्यमंत्री
Join WhatsApp group