पेशीय रचनेशिवाय अन्यही काही सजीवांची लक्षणे विषाणूंमध्ये आढळत नाहीत. ते पुनरुत्पादन करतात असे म्हणण्याऐवजी आपली प्रतिरुपे निर्माण करतात, असे म्हणता येईल. जीवशास्त्रीयदृष्ट्या असा अनाकलनीय सूक्ष्म जीव त्याच्या दृश्य व मोठ्या परिणामांमुळे आपल्या अस्तित्वाकडे लक्ष वेधून घेतो. ज्यावेळी तो एखाद्या जिवंत पेशीत संक्रमित होतो त्यावेळी वेगाने मूळ विषाणूच्या हजारो हुबेहूब प्रतिकृती निर्माण होतात.
ज्यावेळी ते जिवंत पेशीच्या आश्रयाला नसतात किंवा पेशीत संक्रमित होण्याच्या तयारीत असतात. त्यावेळी ते 'व्हायरोन्स' या स्वतंत्र कणांच्या स्वरुपात असतात. त्यांच्यात 'डीएनए' किंवा 'आरएनए' या रेणुंच्या स्वरुपातील जनुकीय सामग्री असते. 'डीएनए' किंवा 'आरएनए'मुळे त्यांच्या प्रोटिनचे स्वरुप ठरते.
या प्रोटिनच्या सहाय्यानेच विषाणूंच्या सर्व कृती घडून येतात. विषाणूंमधील जनुकीय सामग्रीवर अशा प्रोटिनचे किंवा 'कॅप्सिड'चे आच्छादन असते. त्यावरही कोरोनासारख्या काही विषाणूंवर लिपिडस्चे आवरण असते. काही विषाणू एखाद्या जीवाणूच्या शंभराव्या हिश्श्यांइतके सूक्ष्म असतात व ते ऑप्टिकल मायक्रोस्कोपनेही दिसू शकत नाहीत.
इतके सूक्ष्म असले तरी विषाणूंची संक्रमणशीलता मोठी असते. ते अनेक मार्गाने फैलावू शकतात. रोग फैलावणार्या जीवांच्या म्हणजेच 'व्हेक्टर्स'च्या सहाय्याने त्यांचा मोठा फैलाव होतो. उदा.
एखाद्या झाडापासून दुसर्या झाडापर्यंत किटकांच्या माध्यमातून ते फैलावू शकतात. रक्त शोषणार्या किटकांच्या माध्यमातून ते एका प्राण्यातून दुसर्या प्राण्यात संक्रमित होऊ शकतात. एन्फ्लुएंझा व्हायरस हे शिंकणे किंवा खोकणे यामधून फैलावतात. नोरोव्हायरस आणि रोटाव्हायरस हे नाक किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करतात व त्यासाठी हाताचा तोंडाशी संपर्क येणे कारणीभूत ठरते. काहींचा फैलाव अन्न व पाण्यातूनही होतो. एचआयव्हीसारखे विषाणू लैंगिक संबंध किंवा संक्रमित रक्तामधून फैलावतात.