
मुंबईः Maharashtra HSC SSC Result 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात (MSBSHSE) HSC आणि SSC बोर्डाचा निकाल जुलैमध्ये जाहीर करणार आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा यावर्षी मार्च महिन्यात घेण्यात आली होती. निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थी mahahsscboard.maharashtra.gov.in वर आपला रिझल्ट पाहू शकतात.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, 'उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करण्यास उशीर झाल्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब होत आहे.' त्या असंही म्हणाल्या की, '१५ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर केला जाईल आणि जुलै महिन्याच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. दरम्यान, शाळा सुरू करण्यासंबंधी जो विषय आहे त्याबाबत सरकार एसओपी जारी करेल. त्यानुसारच शाळा सुरु होतील. कोव्हिड १९मुळे आम्हाला उत्तरपत्रिका परीक्षकांपर्यंत पाठविताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या. पण मेच्या अखेरीस हे काम पूर्ण झाले.
'आम्हाला जाणीव आहे की, या निकालांना बराच विलंब झाला आहे. पण आम्ही लवकरच निकाल जाहीर करु.' असंही शिक्षणमंत्री म्हणाल्या. यावर्षी बारावीसाठी १३ लाखाहून अधिक परीक्षार्थी आणि दहावीसाठी १७ लाख परीक्षार्थी बसले होते. दरम्यान, दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. या पेपरचे सरासरी गुण दिले जाणार असल्याचंही शासनाकडून सांगण्यात आलं आहे.
आता महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया लक्षात घेऊन निकाल लवकरात लवकर जाहीर व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
काही महत्त्वाची माहिती
- बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू झाली
- सुमारे १४ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
- देशात कोरोना व्हायरस दाखल होण्यापूर्वी १२ वीची परीक्षा १८ मार्च रोजी संपली.
- २५ मार्च पासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे या परीक्षांचे पेपर तपासण्यात आले नाही.
- ६ मे पासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात पेपर तपासण्याच्या कामाला सुरूवात झाली.







