मुंबई : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३,४९३ कोरोनाबाधित आढळले असून, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी, दुसरीकडे राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील गर्दीला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याची चर्चा काही वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, या सर्व अफवा असून, अशा प्रकारचा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या ३० जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही निर्बंध
शिथिल केले आहेत. मात्र, शिस्तीचे पालन न करता रस्त्यांवर, बाजारपेठेत तोबा गर्दी दिसून येत आहे. लोकांनी शिस्त पाळली नाही, तर लॉकडाऊन कडक करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापूर्वीच दिलेला आहे. याच इशाऱ्याचा संदर्भ देत लॉकडाऊन वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. गैरसमज पसरतील अशा बातम्या देणे अथवा सोशल मीडियावर अफवा पसरविणे गुन्हा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे.
मृतांची संख्या ३,७१७
एकूण मृतांची संख्या आता ३,७१७ झाली आहे. आजच्या १२७ मृतांपैकी तब्बल १०६ मृत्यू हे ठाणे आरोग्य मंडळ क्षेत्रातील
आहेत. यात मुंबईतील ९०, ठाणे ११, कल्याण ३ आणि वसई-विरार, मीरा-भार्इंदर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय नाशिक मंडळात नाशिक २, धुळे १, अशा एकूण तीन मृत्यूंची नोंद आहे. याशिवाय पुण्यात १२ मृत्यूंची नोंद झाली. औरंगाबादमध्ये दोन, तर कोल्हापूर मंडळातील सांगली ३, तर अकोला मंडळातील अमरावतीत एका मृत्यूची नोंद झाली आहे.
दिवसभरात ३,४९३ नवीन रुग्ण
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी एक लाखाचा टप्पा पार केला. दिवसभरात ३,४९३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे. त्यासोबतच दिवसभरात १,७१८ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत राज्यात ४७ हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर विविध ठिकाणी ४९,६१६ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरू करीत आहोत; पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतुनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल; पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी अंगीकारावीच लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार आहे. -उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
गरज पडली तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागेल, या मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. उलट आता कितीही संकटे आली तरी त्यांचा आम्ही दृढतेने मुकाबला करू, असे ठासून सांगितले पाहिजे. शिवाय, अर्थव्यवस्था सुरू करण्यासाठी लोकांना मदतही करावी लागेल. -देवेंद्र फडणवीस,
विरोधी पक्षनेते
10,000
रुग्ण भारतात दिवसभरात वाढले
मागील दहा दिवसांत भारतात दररोज
९ ते १० हजारांनी रुग्ण वाढत आहेत. मागील २४ तासांत १० हजारांवर रुग्ण आढळले असून, ३९६ जणांचा मृत्यू झाला. भारताची एकूण रुग्णसंख्या आता तीन लाखांच्या घरात गेली आहे. देशात १,४१,८४२ अॅक्टिव्ह रुग्ण असून १,४७,१९४ रुग्ण बरे झालेले आहेत. देशात कोरोनामुळे आजवर ८,४९८ जणांचा मृत्यू झाला आहे.
40,00,000
रुग्ण जगभरात बरे
जगभरात रुग्णांची संख्या ७६ लाखांवर गेली आहे. कोरोनाने ४ लाख २५ हजारांवर बळी घेतले असून, बरे झालेल्यांची संख्या ४० लाखांवर गेली.








